पारनेर- किरीट सोमय्या यांचा राष्ट्रवादी काँग्रेसचे मा. शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
सरकार स्थापन झाल्यापासून राज्यात विविध प्रश्नांचा हाहाकार उडाला आहे, अशी टीका करतानाच भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार निशाणा साधला. पारनेर येथे ते पत्रकारांशी बोलत होते.
राज्यातील अनेक साखर उद्योग व पवार कुटुंब असा थेट संबंध येत आहे. राज्यातील अनेक कारखान्यांमध्ये पवार यांचा हात असल्याचे दिसून येत आहे. जरंडेश्वर साखर कारखाना ओंकार बिल्डरने राज्य सहकारी बँकेकडून लिलावात विकत घेतला आणि लगेच पवार कुटुंबियांना भाडे पट्ट्यावर चालविण्यास दिला. ओंकार बिल्डरने जरंडेश्वर विकत घेण्यासाठी पैसे कुठून उभे केले, याची चौकशी झाली पाहिजे. तसेच साखर कारखाना विकत घेण्यासाठी क्रांती शुगर विकत घेण्यासाठी भांडवल कसे उभे केले, याची चौकशी होणे गरजेचे आहे. त्यानंतरच सर्व गोष्टी स्पष्ट होतील. या सर्व उद्योगांच्या मागे कोण आहे, हे जनतेच्या लक्षात येईल, असेही सोमय्या म्हणाले. पारनेर साखर कारखान्याबाबत राज्य सहकारी बँकेने केलेल्या घोटाळ्यांची चौकशीची मागणी आपण करत आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार पारनेर सहकारी साखर कारखान्याच्या संशयास्पद विक्री व्यवहाराची चौकशी सुरू झाली आहे. पारनेरच्या सभासदांना निश्चित न्याय मिळेल, असा विश्वासही सोमय्या यांनी व्यक्त केला.