महाराष्ट्र
HSC बारावीची परीक्षा ६१ हजार ४९४ विद्यार्थी शुक्रवारपासून देणार परीक्षा
By Admin
HSC बारावीची परीक्षा ६१ हजार ४९४ विद्यार्थी शुक्रवारपासून देणार परीक्षा
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शुक्रवारी (ता. चार) पहिला पेपर होणार आहे.ही परीक्षा सात एप्रिलपर्यंत चालेल. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला असला, तरी कोरोना प्रतिबंधात्मक नियमावलीचे पालन करूनच परीक्षा घेण्यात येणार आहे. कोरोनामुळे यंदा प्रथमच विद्यार्थ्यांना अर्धा तास वाढीव दिला आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मागील वर्षात बारावीच्या परीक्षा झाल्या नाहीत. आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. शाळा- महाविद्यालये सुरू झाली आहेत.
त्यामुळे ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे.
यंदा बारावीचे ६१ हजार ४९४ परीक्षार्थी आहेत. जिल्ह्यातील ४३८ मुख्य केंद्रांसह उपकेंद्रांवर परीक्षा होणार आहे. या परीक्षेच्या नियोजनाची शिक्षण विभागाने पूर्ण तयारी केली आहे. कोरोनामुळे जिल्ह्यातील प्रत्येक शाळेत परीक्षा उपकेंद्र सुरू केले आहे. या प्रत्येक केंद्रातील परीक्षा हॉलमध्ये २५ विद्यार्थ्यांची व्यवस्था झिगझॅग पद्धतीने केली आहे. या सर्व विद्यार्थ्यांची परीक्षा पूर्वीप्रमाणेच होणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दक्षता समितीची बैठक घेऊन बारावीच्या परीक्षेचा आढावा घेतला. परीक्षा सुरळीत पार पडण्यासाठी मार्गदर्शन केले. परीक्षेचे विद्यार्थ्यांवर दडपण येऊ नये, यासाठी शिक्षण विभागाने लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी यावेळी दिल्या.
अशी आहेत पथके
शिक्षण विभागाने एकूण सात पथके स्थापन केलेली आहेत. त्याचबरोबर प्रत्येक तालुका पातळीवर महसूल विभागाचे पथक राहणार असून, ही पथके परीक्षा केंद्रांना भेटी देऊन गैरप्रकार रोखणार आहेत.
१५ पेक्षा जास्त पट असलेल्या शाळेत परीक्षा केंद्र
कोरोनामुळे प्रत्येक शाळेत उपकेंद्र सुरू केले आहे. १५ पेक्षा जास्त विद्यार्थी असणाऱ्या शाळांत उपकेंद्रे सुरू केली आहेत. ज्या शाळेची विद्यार्थिसंख्या १५च्या आत आहे, अशा शाळांना जवळील उपकेंद्रावर परीक्षेची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.
परीक्षा केंद्र व उपकेंद्रांवर कोरोना नियमावलीचे पालन करून परीक्षा घेतल्या जाणार आहेत. परीक्षा काळात आजारी विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात येणार आहे. ज्यांना आजारपणामुळे परीक्षा देणे शक्य नाही. त्यांना जुलैमध्ये पुनर्परीक्षेची सुविधा आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षेला येताना कंपास, पेन, पट्टी व पाण्याची बाटली आणावी.
- अशोक कडूस, शिक्षणाधिकारी, माध्यमिक शिक्षण विभाग
Tags :
875
10