संघर्षमय जीवनात संतांचे विचार नेहमीच मार्गदर्शक - रामगिरी महाराज
अहमदनगर- प्रतिनिधी
संत वचन हे नेहमी सत्य असतात. त्यांच्या ज्ञानाने परमेश्वर आणि मनुष्य यांच्यातील दुवा साधण्याचे काम संत करत असतात. संतांनी दाखविलेल्या सत्मार्गावर चालल्यास आपले जीवन धन्य होत असते. भगवंताच्या नामात मोठी शक्ती असल्याने प्रत्येकाने भगवंताचे नामस्मरण केले पाहिजे.जीवन हे संघर्षमय आहे.प्रत्येक गोष्टीसाठी आपणास संघर्ष करावा लागत असतो.यातून संत विचार आपणास मार्ग दर्शक ठरु शकतात.संत भगवान बाबा आणि संत वामनभाऊ यांनी समाज उद्धाराचे काम केले.त्यांनी समाजाला दिशा देऊन स्वत:चा विचार करण्यापेक्षा दुसर्याचा विचार करा ही शिकवण दिली. भगवंताच्या नामाने आपले जीवन सुख होऊ शकते,असे मौलिक विचार हभप महंत रामगिरी महाराज यांनी व्यक्त केले.
सारसनगर येथील श्री संत भगवानबाबा सेवाभावी प्रतिष्ठानच्यावतीने संत भगवान बाबा व संत वामनभाऊ पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आयोजित सप्ताहामध्ये हभप महंत रामगिरी महाराज यांचे किर्तन झाले. सप्ताहाचे उद्घाटन नगरसेविका सुवर्णा जाधव यांच्या हस्ते झाले.याप्रसंगी हभप प्रभाताई भोंग,हभप अमोल महाराज आदि उपस्थित होते.या सप्ताह दरम्यान हभप संतोष महाराज खेडकर(आळंदी),हभप माऊली महाराज सबलस (आळंदी),हभप जगन्नाथ महाराज शास्त्री,हभप नंदकिशोर महाराज खरात,पुरुषोत्तम महाराज शास्त्री(बीड), आचार्य हरिदास महाराज शास्त्री(आळंदी)आदिंची किर्तनसेवा या ठिकाणी झाली.हभप रविंद्र महाराज यांनी संत भगवान बाबा व वामनभाऊ यांचे संगीत चरित्राचा कार्यक्रम सादर केला.