महाराष्ट्र
789
10
सणासुदीत चोरटे सक्रिय; तीन ठिकाणी घरफोड्या
By Admin
सणासुदीत चोरटे सक्रिय; तीन ठिकाणी घरफोड्या
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अहमदनगर शहर, उपनगरात तसेच सर्व तालुक्यात ऐन सणासुदीच्या काळात चोर्या, घरफोड्या, बॅग चोरी, सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. सोमवारी रात्री, मंगळवारी पहाटे शहरातील कोतवाली, तोफखाना पोलिस ठाणे हद्दीत तीन ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या.
वाढत्या चोरी, घरफोडी, सोनसाखळी व बॅग चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. मात्र चोरट्यांना अटक करण्यात शहर पोलिसांना अपयश आले आहे.
कोरोनाचे नियम शिथिल झाले आहेत. सर्व आस्थापना खुल्या झाल्या आहेत. मंदीर, शाळा, कॉलेज सुरू झाले आहेत. सणासुदीचा काळ सुरू झाल्यामुळे बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झाले आहे. लोक सणासुदीच्या काळात खरेदीसाठी बाहेर पडत आहे. यातच चोरटे सक्रिय झाले आहेत. घर फोडी होते, तर खरेदीसाठी बाहेर पडणार्या महिलांच्या गळ्यातील सोन्याची चोरी होते. दुसरीकडे बँकेतून काढलेल्या पैशांवर चोरट्यांची पाळत असते, संधी मिळताच पैशाची बॅग लंपास केली जाते.
गेल्या महिनाभरात पैशाच्या बॅग चोरीला गेल्याच्या तीन घटना घडल्या. चोरी, घरफोडी, सोनसाखळी चोरीचे प्रकार दररोज सुरू आहे.
सोमवारी मध्यरात्री ते मंगळवारी पहाटे तोफखाना व कोतवाली पोलिस ठाणे हद्दीत घरफोडीच्या तीन घटना घडल्या. तपोवन रोडवरील सूर्यनगरच्या साईकृपा अपार्टमेंटमध्ये किसन एकनाथ लवांडे (वय 72) यांचे घरफोडून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे, रोख रक्कम, चांदीची भांडी बरोबरच अमेरिकन डॉलरसह एक लाख नऊ हजार 500 रूपयांचा मुद्देमाल चोरून नेला. घरफोडीची दुसरी घटना बालिकाश्रम रोडवर घडली. या रोडवरील दुकान चोरट्यांनी फोडले. तेथुन रोख रक्कम व साहित्य असा 64 हजार 160 रूपयांचा ऐवज चोरून नेला आहे. कोतवाली पोलिस ठाणे हद्दीतील बुरूडगाव रोडवरील इंपेरिअल चौकात एक शॉप फोडून 18 हजार रूपयांची रोकड लंपास केली. याप्रकरणी शेख गुलाम हबीब खलील अहमद (रा. सर्जेपुरा) यांनी फिर्याद दिली आहे.
Tags :

