महाराष्ट्र
शेवगावमध्ये दोन विवाह होऊनही तिसऱ्याला विवाह करत फसवले
By Admin
शेवगावमध्ये दोन विवाह होऊनही तिसऱ्याला विवाह करत फसवले
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेवगाव - उपवर मुलाला मुलीचे स्थळ आणून टोपी घालण्याचे सध्या पेवच फुटले आहे. तालुक्यातील नवीन दहिफळ शिवारात ऊसतोडीसाठी आलेल्या विवाहेच्छुक मुलाला अगोदर एक नव्हे, तर दोनदा विवाह झालेले असतानाही नवरी मुलीने आणि तिच्या दलालांनी जवळपास लाखभर रुपयाला टोपी घातल्याची तक्रार शेवगाव पोलिस ठाण्यात काल दाखल झाली आहे.
विशेष म्हणजे नवऱ्या मुलीचा अगोदर विवाह झालेल्या एका मुलाविरुद्ध पोटगीचा दावा न्यायालयात चालू असतानादेखील या मंडळींनी या ऊसतोड मजूर युवकास गंडा घातला.
नवीन दहिफळ शिवारात सुनील मगर यांच्याकडे ऊसतोडणीसाठी आलेल्या संकेत विजय घोक्षे (वय 28, रा. घोगस पारगाव, ता. शिरूर, जि. बीड) यांनी काल शेवगाव पोलीस ठाण्यात फसवल्याबाबत आणि त्या पोटी घेतलेल्या रोख 50 हजार रुपये व दागिने परत मिळण्यासाठी मुलीच्या, तसेच मध्यस्थांविरुद्ध तक्रार दाखल केली.
या संदर्भात दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, दोन महिन्यांपूर्वी राहुल नगर (ता. पैठण) येथील शीला बबन खडसन, बबन सोनाजी खडसन, सतीश बबन खडसन, तसेच गोकुळा संदीप चाबुकस्वार (रा. पिंपळवाडी, ता. पैठण) व प्रकाश पैलवान (रा. शेवगाव) हे सुनील मगर यांच्या घरी नवीन दहिफळला आले. त्यांनी माझे आई-वडिलांना आमच्याकडे मुलगी आहे, असे सांगितले. आई-वडिलांनी त्यांना आम्हाला मुलाचे लग्न करायचे आहे. मात्र, मुलीने मुलांबरोबर ऊसतोडीचे काम
केले पाहिजे, अशी त्यांना कल्पना दिली. त्या वेळी त्यांनी माझ्या आई-वडिलांना आमची मुलगी तुम्हाला देतो, ऊसतोडीचे कामसुद्धा ती करीन. मात्र, तुम्हाला पन्नास हजार रुपये आम्हाला द्यावे लागतील, असे सांगितले. त्या वेळी आई-वडील पन्नास हजार रुपये देण्यास तयार झाले.
त्यानंतर आई-वडिलांनी 50 हजार रुपये रक्कम सुनील मगर यांच्याकडून उचल म्हणून घेऊन मुलीच्या वडिलांना दिली. त्यानंतर मगर यांच्या घरीच लग्न लावण्यात आले. लग्नात मुलीला पाच ग्रॅमचे मंगळसूत्र, दोन ग्रॅमचे कानातील फुले, दहा-भाराच्या चांदीच्या पट्ट्या व पाच भाराचे जोडवे असे दागिने घेतले. त्यानंतर नातेवाईकांसमक्ष नऊ ऑक्टोबर 2022ला लग्न लावण्यात आले. नवरी मुलगी दोन दिवस माहेरी जाऊन आल्यानंतर मात्र नवीन नवरी म्हणून सुरुवातीला आम्ही ऊसतोडीस तिला नेले नाही. त्यानंतर पंधरा दिवसांनी ऊसतोडीसाठी चल म्हटले तर तिने नकार दिला. ती नातेवाईक व आई-वडिलांना सारखी फोन करायची.
घरातील कामालासुद्धा ती हात लावत नसे. दि. 13 नोव्हेंबर 2022 रोजी तिने आई-वडील व भाऊ, बहीण यांना नवीन दहिफळला बोलावून घेतले. त्यांनी आम्हास आमची मुलगी न्यायची आहे म्हणून सांगितले. त्यावर लग्नासाठी तुम्हाला उचल घेऊन दिलेले 50 हजार रुपये परत द्या, अशी मागणी केली. तेव्हा उलट आम्हाला दमबाजी करण्यात आली. नंतर फोनसुद्धा घेईना. म्हणून आम्ही नातेवाईकाकडे चौकशी केली असता ती नांदायला येणार नाही, असे समजले. अधिक चौकशी केली असता या नवऱ्या मुलीचे या अगोदर दोन वेळेला लग्न झाल्याचे समजले. त्यातील आकाश अण्णासाहेब नरवडे (रा. चितेगाव, ता. पैठण) याच्याविरुद्ध तिने न्यायालयात पोटगीचा दावा दाखल केल्याचेदेखील समजले. ही सर्व माहिती आमच्यापासून लपवून ठेवली, म्हणून वरील पाच जणांविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Tags :
949379
10