फरार आरोपीला मदत करणार्यास सक्तमजुरी
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेल्या आरोपीला आश्रय देऊन पुरावा नष्ट करणार्या बाबासाहेब भाऊ मराठे (वय 36, रा.मराठवाडी, ता.आष्टी, जि.बीड) याला न्यायालयाने तीन वर्षे सक्तमजुरी व पाच हजार दंड अशी शिक्षा ठोठावली.
प्रधान जिल्हा व सत्र न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी हा निकाल दिला आहे. सरकार पक्षातर्फे सरकारी वकील अनिल ढगे यांनी काम पाहिले.
मच्छिंद्र महादेव अकोलकर हा 7 एप्रिल 2016 रोजी हा त्याच्या पत्नीला मढी , मायंबा येथे देवदर्शनासाठी जायचे आहे, असे सांगून कारने घेवून गेला होता. करंजी ते पाथर्डी जाणार्या रस्त्यावर मच्छिंद्र अकोलकर याने त्याची पत्नी अश्वीनी हिच्यावर चाकूने वार करून ठार मारले होते. बाबासाहेब मराठे याने खुन करण्यासाठी मदत केली होती. तसेच, मयत महिलेचे प्रेत जातेगाव घाटात नेऊन पेट्रोल टाकून पेटवून देण्यास मदत केली. आरोपी बाबासाहेब मराठे याने मच्छिंद्र अकोलकर याला गुन्ह्यातील पुरावे नष्ट करण्यास मदत केली होती.
त्यानंतर आरोपीने स्वतः पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची फिर्याद दिली होती. त्यानुसार पोलिसांनी दोघांवर गुन्हा दाखल केला होता. पोलिस उपनिरीक्षक एस. व्ही. शिंदे यांनी घटनेचा तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षाच्या वतीने एकूण 14 साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. पेट्रोल पंपावरील व टोल नाक्यावरील सीसीटीव्हीमधून ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागला. या खटल्यामध्ये सरकार पक्षाच्या वतीने सुरुवातीस अॅड. मनिषा केळगंद्रे-शिंदे यांनी काम पाहीले. त्यानंतर अॅड. अनिल ढगे यांनी युक्तीवाद पूर्ण केला. पैरवी अधिकारी म्हणून सहायक पोलिस उपनिरीक्षक महेश जोशी यांनी सहकार्य केले.