महाराष्ट्र
चिमुरडीचा खून करणार्यास जन्मठेप ; प्रेम प्रकरण उघड होऊ नये म्हणून कृत्य
By Admin
चिमुरडीचा खून करणार्यास जन्मठेप ; प्रेम प्रकरण उघड होऊ नये म्हणून कृत्य
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
शेजारच्या मुलीशी प्रेमसंबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करताना ते मामाच्या अल्पवयीन मुलीने पाहिले. हे तिने मामाला सांगू नये, यासाठी तिचा खून केल्याप्रकरणी आरोपीला जन्मठेप आणि पाच हजार रूपये दंडाची शिक्षा नेवासा येथील विशेष न्यायालयाने सुनावली आहे.
येथील विशेष न्यायाधीश जी. बी. जाधव यांनी हा निकाल दिला. अप्पासाहेब नानासाहेब थोरात (रा. आगारनांदूर, ता. पैठण, जि. औरंगाबाद) असे आरोपीचे नाव आहे. आरोपी हा नेवासा तालुक्यातील सौंदाळा येथे त्याच्या मामाकडे शिक्षण घेण्यासाठी आला होता. मामाच्या घराशेजारी राहणार्या अल्पवयीन मुलीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिच्याशी लगट करून प्रेमसंबंध प्रस्थापित करू पाहत होता.
हा सर्व प्रकार आरोपीच्या मामाच्या अल्पवयीन मुलीने पाहिला होता. तिने हा प्रकार वडिलांना सांगण्याचे म्हटल्याने, आरोपीने मामाच्या लहान मुलीचा काटा काढण्याचे ठरविले. अप्पासाहेब हा 20 जून 2020 रोजी रात्री घरात घुसून मामाच्या अल्पवयीन मुलीच्या तोंडावर रग टाकून तिला मारण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी बाजूलाच झोपलेल्या तिच्या मोठ्या बहिणीने हे पाहिल्यानंतर, आरोपीने तिला शांत बसण्यास सांगत, ओरडलीस तर ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर त्याने चिमुरडीच्या छातीवर बसून रग तोंडावर टाकून तिला ठार मारले.
मयत मुलीचे आई-वडील सकाळी शेतातून आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. मुलगी झोपेतून उठत नसल्याने तिला साप चावला असेल, अशी बतावणी आरोपीने केली. मुलीचा श्वास रोखून खून करण्यात आल्याचा अहवाल डॉक्टरांनी दिल्यानंतर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. याबाबतचा तपास नेवासा पोलिस ठाण्याचे तत्कालीन पोलिस निरीक्षक रणजित डेरे यांनी करुन आरोपीविरूद्ध दोषारोपपत्र दाखल केले होते.
या खटल्यात सरकार पक्षातर्फे नऊ साक्षीदार तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार मयत मुलीची मोठी बहीण, वैद्यकीय अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. सरकार पक्षाच्या वतीने विशेष सरकारी वकील अॅड. देवा काळे यांनी काम पाहिले. पोलिस कॉन्स्टेबल सुभाष हजारे, राजू काळे, बाळासाहेब बाचकर, ज्योती नवगिरे, जयवंत तोडमल यांनी पैरवी अधिकारी म्हणून सहकार्य केले.
Tags :
775420
10