श्वानाला वाचविण्याच्या नादात ट्रक उलटून अपघात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
अचानकपणे रस्त्यावर आलेल्या श्वानाला वाचविण्याच्या नादात ट्रक झोला घेऊन रस्त्यावरच उलटला. मात्र, सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नसली, तरी मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली असल्याची घटना कल्याण-अहमदनगर महामार्गावर आणे गावाजवळ घडली.
ट्रकला आणे गावाजवळ असलेल्या गतिरोधकापूर्वी श्वान आडवा आला. त्या श्वानाला वाचविण्याच्या नादात ट्रकचालकाने ब्रेक लावला मालवाहतूक ट्रकला झोला बसल्याने ट्रक रस्त्यावरच उलटला.
ट्रकचालक सावध असल्याने बचावला. पण, या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ट्रकमधील डाळिंबांचे क्रेट रस्त्यावर पसरले, त्यामुळे कल्याण-अहमदनगर महामार्गावर तब्बल अर्धा तास वाहतुकीची कोंडी झाली. रात्री गस्तीवरील बेल्हे पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थांच्या मदतीने रस्त्यावरील डाळिंबाचा ढीग बाजूला करत वाहतुकीला रस्ता मोकळा केला.
ट्रकचालकाने घटना मालकाला सांगून दुसरा ट्रक बोलावून डाळिंबाचे क्रेट दुसर्या ट्रकमध्ये भरून रवाना केले. आळेफाटाचे पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, सहायक पोलिस निरीक्षक सुनील बडगुजर यांच्या नेतृत्वाखाली पोलिस हवालदार विकास गोसावी, पोलिस शिपाई महेश काटमोरे आदींनी घटनास्थळी तातडीने धाव घेऊन मदत केल्याचे सरपंच प्रियांका दाते यांनी सांगितले.