तलाठी पदासाठी 'डमी'ने दिली ऑनलाईन परीक्षा!अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी दिली फिर्याद
नगर सिटीझन live team-
तलाठी पदाच्या परीक्षेमध्ये दोन विद्यार्थ्यांच्या जागेवर डमी विद्यार्थ्यांनी परिक्षा दिल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भारती विद्यापाठ पोलिसांनी चौघांविरुद्ध फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी अहमदनगर येथील तहसीलदार माधुरी आंधळे यांनी फिर्याद दिली आहे. नेमीचंद विठ्ठलसिंग ब्रम्हनात (वय ३९, रा. औरंगाबाद) आणि रामेश्वर विठ्ठल जरवाल (वय २७) आणि त्यांच्या नावावर डमी बसलेले दोघे अशा चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही परिक्षा आंबेगाव बुद्रुक येथील संकल्प बिजनेस स्कुल येथे १७ जुलै २०१९ रोजी घेण्यात आली होती. कागदपत्र पडताळणीच्या वेळी उमेदवारांनी सादर केलेली कागदपत्र व प्रत्यक्ष परिक्षेच्यावेळी दिलेली कागदपत्र यांच्यामध्ये आढळलेल्या
तफावतीनंतर करण्यात आलेल्या चौकशीत हा प्रकार उघड झाला.
अहमदनगर जिल्ह्यातील तलाठी पदासाठी ऑनलाईन अर्ज मागविण्यात आले होते. या पदासाठी महापोर्टलच्या माध्यमातून ऑनलाईन परीक्षा धेण्यात आली.
पडताळणीमध्ये १० उमेदवारांचे फोटो, सही, हजेरी पट तपासण्यात आले. त्यावेळी संशयास्पद वाटलेल्या १० जणांच्या जागेवर दुसर्यांनीच परीक्षा दिल्याचे समोर आले. अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयात या परिक्षेच्या दृष्टीने तपासणी करण्यात आली.
त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यात आली. त्यातील एक केंद्र आंबेगाव बुद्रुक येथील असल्याने हा गुन्हा भारती विद्यापीठ पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे.