महाराष्ट्र
15141
10
पाथर्डी : विरोधकांकडून चुकीचा कारभार : आमदार मोनिका राजळे
By Admin
पाथर्डी : विरोधकांकडून चुकीचा कारभार : आमदार मोनिका राजळे
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
बाजार समितीची निवडणूक आमदारकीची निवडणूक समजा. तुमच्या भवितव्यासाठी एकमेकांना साथ द्या आणि सर्वांनी संघटितपणे निवडणुकीला सामोरे जा.
विरोधकांनी बाजार समितीत चुकीचा कारभार करून शेतकर्यांचे हाल केले. त्या बाजार समितीचा आपल्याला आदर्शवत कारभार राज्याला दाखवून द्यायचा आहे, असे आवाहन आमदार मोनिका राजळे यांनी सोमवारी केले.
पाथर्डी बाजार समितीच्या निवडणुकीसाठी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आमदार राजळे यांच्या मार्गदर्शनाखाली विठोबाराजे मंगल कार्यालयात झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढेे, तालुकाध्यक्ष माणिक खेडकर, राहुल राजळे, अर्जुन शिरसाट, माजी नगराध्यक्ष अभय आव्हाड, गोकुळ दौंड, उद्धव वाघ, अशोक चोरमले, नंदकुमार शेळके, विष्णुपंत अकोलकर, अजय रक्ताटे, नारायण धस, संजय बडे, अमोल गर्जे आदी उपस्थित होते. बाजार समितीमध्ये सत्ताधार्यांपैकी काही संचालक मेळाव्याला उपस्थित असल्याने राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरला आहे.
राजळे म्हणाल्या, की येणारा वर्षभराचा काळ हा निवडणुकीचा असणार आहे. या काळात कार्यकर्त्यांनी नेत्याविषयी राग-लोभ न ठेवता प्रामाणिकपणे काम करावे. आमदारकीप्रमाणे ही बाजार समितीची छोटी निवडणूक असणार आहे. गावागावात जाऊन मतदारांशी संवाद साधून एकेकमत मिळविले पाहिजे. शेतकर्यांच्या हितासाठी बाजार समितीच्या निवडणुकीत आपण साथ द्यावी, अशी साद त्यांनी घातली.
माजी संचालक नारायण धस म्हणाले की, बाजार समितीत नको ते राडे पाहिल्याने आम्ही लांब गेलो. संचालक मंडळाचे खूप प्रताप झाले असून, संचालकांनाही मार खावा लागला. बाजार समितीत झालेला गचाळ प्रकार आता धुऊन काढायचा आहे.
गोकुळ दौंड म्हणाले, विरोधक कामाचा हिशेब मागतात. तुम्हाला हिशेब मागायचा अधिकार कोणी दिला? तुमचे अडीच वर्षे राष्ट्रवादीचे सरकार होते. तुम्ही एक रुपयाचाही निधी आणला नाही आणि आता हिशेब मागत आहात. अरुण मुंढे म्हणाले, मधल्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार आले, तेव्हा ते मलिदा ओढण्यात मग्न होते. त्यांना सर्वसामान्य शेतकर्यांचे काही देणे-घेणे नाही. बाळासाहेब अकोलकार यांनी स्वागत केले. सूत्रसंचालन राजू सुरवसे यांनी केले. डॉ. मृत्युंजय गर्जे यांनी आभार मानले.
वरिष्ठांशी चर्चा करून उमेदवार देणार
माजी आमदार तथा ज्येष्ठ नेते आप्पासाहेब राजळे सक्रिय झाले असून त्यांनी जुन्या-नव्या कार्यकर्त्यांची मोट बांधण्याचे काम सुरू केले आहे. जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी कर्डिले, खासदार डॉ. सुजय विखे, पक्षाचे जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे यांच्याशी व वरिष्ठ नेत्यांशी विचारविनिमय करून या निवडणुकीत उमेदवार दिले जातील, असे आमदार राजळे यांनी स्पष्ट केले.
Tags :
15141
10





