महाराष्ट्र
6407
10
पाथर्डी- अजित पवार रविवारी तिसगावमध्ये भूमीपूजन कार्यक्रमसाठी येणार
By Admin
पाथर्डी- अजित पवार रविवारी तिसगावमध्ये भूमीपूजन कार्यक्रमसाठी येणार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी, नगर व राहुरी तालुक्यातील 43 गावांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार्या मिरी-तिसगाव प्रादेशिक योजनेच्या कामासाठी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी विशेष प्रयत्न करून 155 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे.
यामध्ये काही नवीन गावांचाही समावेश करण्यात आला असून, या कामाचे भूमिपूजन करण्यासाठी विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी (दि.5) तिसगावात येणार आहेत. कार्यक्रमाच्या पूर्वतयारीसाठी आमदार तनपुरे यांनी तिसगावातील कार्यक्रम स्थळाची पाहणी करत आढावा घेतला.
आमदार तनपुरे यांनी पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागाचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लागावा, या हेतूने अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून राज्य सरकारचे या पाणीटंचाईकडे लक्ष वेधले होते. तसेच, निधीसाठी प्रयत्न केला. तिसगाव सारख्या मोठी लोकसंख्या असणार्या गावाला गेल्या अनेक दिवसापासून पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. यासाठी मुळा धरणापासून थेट तिसगावपर्यंत स्वतंत्र पाईपलाईन टाकून तिसगावचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचे आमदार तनपुरे यांचे नियोजन आहे.
त्याचबरोबर निंबोडी, शिरापूर, घाटशिरस, त्रिभुवनवाडी, आठरे कौडगाव, देवराई, सातवड, अशा गावांना पिण्याच्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. या योजनेसाठी 155 कोटी रुपयांचा निधी 43 गावांसाठी मिळत असून, या कामाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते होणार असून, रविवारी (दि.5) विरोधी पक्ष नेते पवार तिसगावात येणार असल्याची माहिती आहे. या कार्यक्रमासाठी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते तयारीला लागले आहेत. या कार्यक्रमाच्या नियोजनाचा आमदार तनपुरे यांनी बुधवारी (दि.1) आढावा घेतला. कामाचे भूमिपूजन राज्याचे विरोधी पक्ष नेते अजित पवार यांच्या हस्ते सकाळी दहा वाजता होणार आहे, अशी माहिती माजी सरपंच काशिनाथ लवांडे यांनी दिली.
'आमदार तनपुरेंचा शब्द पूर्णत्वास'
आमदार प्राजक्त तनपुरे यांच्या विशेष प्रयत्नातून तिसगावसाठी स्वतंत्र पाईपलाईन टाकून पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावण्याचे नियोजन आमदार तनपुरे यांनी शब्द दिल्याप्रमाणे आता पूर्णत्वास येत आहे.
Tags :

