महाराष्ट्र
15856
10
पाथर्डी नगरपालिका प्रशासनाची थकबाकी वसुली मोहीम
By Admin
पाथर्डी नगरपालिका प्रशासनाची थकबाकी वसुली मोहीम
वसुली पथकाची अवघ्या चार दिवसात तब्बल दहा टक्के वसुली
पाथर्डी - प्रतिनिधी
मार्च अखेर जवळ येऊन देखील पालिका प्रशासनाची वसुली मोहिमेची टक्केवारी तुलनेत कमी असल्याने मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी वसुली पथक नियुक्त करुन अवघ्या चार दिवसांमध्येच थकबाकीतील तब्बल दहा टक्के वसुली केली आहे.
मूलभूत गरजासह नागरिकांना विविध प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पालिका प्रशासनाला घरपट्टी व नळपट्टीचा उपयोग होतो.मात्र या आर्थिक वर्षामध्ये १७ मार्च अखेरपर्यंत वसुलीचे प्रमाण अवघे ४३ टक्के होते.यामुळे पालिका प्रशासन अडचणीत सापडले.थकीत रकमेच्या वसुलीची टक्केवारी वाढावी यासाठी मुख्याधिकारी संतोष लांडगे यांनी करनिरीक्षक सोमनाथ गर्जे,कार्यालयीन अधीक्षक आयुब सय्यद,पाणीपुरवठा प्रमुख अशोक डोमकावळे,बांधकाम विभागाचे लक्ष्मण हाडके,सोमनाथ धरम,गौरव आदीक,अरुण सोनटक्के आदि सह इतर कर्मचाऱ्यांचे वसुली पथक नेमले.या वसुली पथकाने १७ ते २० मार्च या चार दिवसांमध्ये तब्बल दहा टक्के थकबाकीतील रक्कम जमा केली.यासाठी सकाळी दहा ते सायंकाळी उशिरापर्यंत दुकाने,कार्यालयासह अगदी गल्लोगल्ली व घरोघरी फिरून थकबाकीदारांचे प्रबोधन करून वसुली करण्यात येत आहे.विशेष म्हणजे थकबाकी भरणा करण्यासाठी नागरिकांना सोयीचे व्हावे, यासाठी पालिका कार्यालयामध्ये तीन विभाग करण्यात आले आहेत.शनिवार,रविवार या सुट्टीच्या दिवशी देखील सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेसात पर्यंत कार्यालयामध्ये भरणा करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.याला प्रतिसाद देत नागरिकांनी देखील मागील चार दिवसांमध्ये वसुली मोहिमेला मोठा प्रतिसाद दिला आहे.
वेळेत भरणा करून कटूता टाळावी. नळ अथवा घर सील केले तर नागरिक व प्रशासनात कटूता निर्माण होते.सर्व दाखले आता ऑनलाईन पद्धतीने मिळत असल्याने,नागरिकांना कराचा भरणा करणे अत्यावश्यक आहे.नागरिकांनी वेळेत कराचा भरणा केला तर चक्रवाढ व्याज लागत नाही.यासाठी नागरिकांनी वेळेत कराचा भरणा करून पालिका प्रशासनाला सहकार्य करावे- मुख्याधिकारी संतोष लांडगे
थकीत करभरणा वसुलीसाठी पालिकेचे पथक घरोघरी जाऊन वसुली करत आहे.
Tags :
15856
10





