जबरी चोरीच्या गुन्ह्यातील सराईत गुन्हेगार गजाआड
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील तिसगाव व नगर तालुक्यातील मठपिंप्री येथे जबरी चोरी करून पसार झालेल्या आरोपीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या.
ही कारवाई गुरूवारी करण्यात आली. सोपान उर्फ टोण्या भाऊसाहेब काळे(वय 19, रा. लखमापुरी, ता. शेवगाव) असे आरोपीचे नाव आहे. अधिक माहिती अशी, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव घरफोडी करून एक जाख 12 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला होता. याप्रकरणी नंदकुमार सीताराम गाडगे यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्यातील आरोपींच्या शोधाकामी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस पथक शेवगाव व पाथर्डी परिसरात पेट्रोलिंग करीत असताना या गुन्ह्यातील आरोपी खरवंडी ते पाथर्डी रस्त्यावर टाकळी फाटा येथे दबा धरून बसल्याची माहिती मिळाली.
त्यानुसार पोलिस पथकाने टाकळी फाटा येथे जाऊन शोध सुरू केला असता आरोपींना पोलिसांची चाहुल लागली आणि त्यांनी तेथून धूम ठोकली. पोलिसांनी पाठलाग करून एकास पकडले मात्र, त्याचे अन्य साथीदार पळून जाण्यात यशस्वी झाले. आरोपी सोपान काळे यांच्याकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. तर, मठपिंप्री येथे चोरीचा गुन्हा केल्याचीही कबुली दिली. आरोपीला पाथर्डी पोलिस ठाण्यात हजर केले. आरोपी काळे याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत. ही कारवाई पोलिस निरीक्षक अनिल कटके, सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे, उपनिरीक्षक सोपान गोरे, हवालदार सुनील चव्हाण, दत्तात्रेय हिंगडे, बबन मखरे, संदीप पवार, मनोहर गोसावी, संदीप गव्हाणे, शंकर चौधरी यांच्या पथकाने केली.