महाराष्ट्र
अहमदनगर जिल्ह्यातील ६०९ गावांवर लम्पीसदृश्य आजाराचे सावट
By Admin
अहमदनगर जिल्ह्यातील ६०९ गावांवर लम्पीसदृश्य आजाराचे सावट
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
शेतकर्याच्या पशुधनावर लंपी त्वचारोगाचे आलेले संकट दिवसेंदिवस व्यापक होत चालले आहे. 105 गावांतील जनावरे या आजाराने बाधित झाली आहेत तर पाच किलोमीटर अंतरावरील 609 गावे लंपीसदृश आजाराच्या छायेखाली आहेत.
पशुसंवर्धन विभाग सातत्याने जनावरांचे लसीकरण करत आहे. आत्तापर्यंत 255 जनावरे लम्पी आजारातून बरी झाली आहेत. जिल्ह्यात 536 जनावरे लम्पीने बाधित असून, 19 जनावरांचा मृत्यू झाला आहे.
यंदा समाधानकारक पाऊस झाल्यामुळे जिल्ह्यातील शेतकरी जरा कुठे सुखावला असतानाच लंपी या आजाराने बाधित जनावरांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत चालल्याने त्याच्या काळजाचा ठोका चुकू लागला आहे. पोटच्या लेकरासमान प्राणप्रिय असलेले त्याचे पशुधन संकटात सापडले आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून लसीकरण, औषधोपचार सुरु झाले आहेत. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संभाजी लांगोरे तालुकानिहाय दौरे करत असतानाच प्रशासनाला आवश्यक त्या सूचनाही करत आहेत. जिल्ह्यातील 105 गावांत लंपी या आजाराची जनावरांना लागण झाली आहे. एकूण 536 जनावरे आजारी आहेत तर वेळीच औषधोपचार मिळाल्यामुळे यापैकी 255 जनावरे बरीही झाली आहेत. 6 लाख 50 हजार 801 जनावरे बाधित होण्याची शक्यता आहे.
लंपी या त्वचारोगाची लागण झाल्यामुळे आजवर 19 जनावरांचा मृत्यु झाला आहे. बाधित जनावरे आढळलेल्या पाच किमी अंतरावर असलेल्या 609 गावांमधील 6 लाख 13 हजार 349 जनावरांना लसीकरण करणे गरजेचे आहे. 3 लाख 50 हजार 900 लसमात्रा उपलब्ध असून कालअखेर (गुरुवार) 3 लाख 31 हजार 587 जनावरांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. तसेच 261 गावांत फॉगिंग पूर्ण झाले आहे. जिल्ह्यात गोजातीय १४ लाख आणि म्हैस जातीचे २ लाख असे एकूण १६ लाख पशुधन आहे. पशुधनाच्या संखेच्या तुलनेत लंपीबाधित जनावरांचे प्रमाण अत्यल्प आहे. आतापर्यंत ज्या 19 जनावरांचा मृत्यु झाला आहे त्यापैकी बहुतांशी जनावरांना अन्य आजार होते. प्रामुख्याने गोचीड तापाची लागण झालेली जनावरेच यात बळी पडली. त्यामुळे आपण जनावरांच्या रक्तांच्या नमुन्यांत गोचीड तापाचीही तपासणी करत आहोत. अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे लसमात्राही भरपूर प्रमाणात आहेत आणि त्या देण्याचे कामही युद्धपातळीवर चालू आहे. त्यामुळे, पशुपालकांनी गांगरुन न जाता पशुसंवर्धन खात्याच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करावे.
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांच्या संकल्पनेतून जिल्ह्यातील 14 पंचायत समित्यांमध्ये औषध बँक उभारली जाणार आहे. शासन स्तरावरुन जनावरांची औषधे उपलब्ध होतातच. मात्र जनावरे गंभीर अवस्थेत असली तर त्यांच्यासाठी महागडी औषधे गरजेची असतात. त्या औषधांसाठी शेतकर्यांची मोठी परवड होते. औषध बँकेत त्या औषधांचा साठा ठेवला जाणार आहे. काही ठिकाणी औषध बँका सुरु झाल्या असून लवकरच सर्व ठिकाणी औषध बँका सुरु होणार आहेत.: डॉ. सुनिल तुंबारे, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त
Tags :
448
10