पाथर्डी- तात्काळ वीज सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन अविनाश पालवे
पाथर्डी- प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील माणिकदौंडी परिसरासह शिरसाटवाडी, मोहरी, मोहटा या भागाची शेतीपंपाची वीज प्रत्येकी शेतकरी ३ हजार रुपये बिल भरण्यासाठी वीजपुरवठा महावितरणने नुकताच बंद केला. याच्या निषेधार्थ मनसे परिवहन सेनेचे जिल्हाध्यक्ष तथा शिरसाटवाडीचे सरपंच अविनाश पालवे यांनी महावितरण कार्यालयात जाऊन तात्काळ विज सुरू करा, अन्यथा तीव्र आंदोलन करेल, असा इशारा दिला.
उपकार्यकारी अभियंता माळी , इंजिनीयर अहिरे व जिल्हा वीज अभियंता काकडे यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी अविनाश पालवे म्हणाले, शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून दोन महिन्यापूर्वीच पाच हजार रुपये बिल शेतकऱ्यांनी भरलेले आहेत, पुन्हा लगेच बिल भरायला लावणे हा अन्याय आहे. तसेच शेतकऱ्यांना कुठलीही पूर्वकल्पना न देता वीज बंद केलेली आहे. तरी येत्या काही दिवसांमध्ये बिल भरली जातील. आपण वीज पुरवठा तात्काळ सुरु करा, अशी मागणी केली.
यावर लगेच तात्काळ शिरसाटवाडी गावासह मोहरी, माणिकदौंडी परिसरातील वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यानंतर अविनाश पालवे यांनी महावितरणचे आभार मानले.