संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत कारखाने सुरु राहणार - मुख्यमंत्री
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महाराष्ट्रातील काही भागात साखर कारखाने बंद झाले तरी ऊस मात्र संपला नसल्याचं चित्र आहे. यामुळे शेतकऱ्यांनी शेतात शिल्लक ऊसाच करावं काय ? हा यक्ष प्रश्न आहे, कारण ऊसासाठी घेतलेले कर्ज आणि ऊस उत्पादन ही शुन्य यामूळे काय करावं हा प्रश्न न सुटणारा होता.
यासाठी शेतकऱ्यांचा संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु राहणार असल्याचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. (Sugar mills will continue till all sugarcane is crushed - CM )
राज्यात यंदा ऊसाचे उत्पादन अधिक झाले असून, मागील हंगामाच्या तुलनेत २.२५ लाख हेक्टर ऊस क्षेत्र जास्त आहे. यासाठी संपूर्ण ऊस गाळप होईपर्यंत साखर कारखाने सुरु ठेवावे, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बैठकीत दिले. शेतकऱ्यांच्या हित लक्षात घेत 1 मे नंतर गाळप झालेल्या सर्व ऊसाला अतिरिक्त ऊस गाळप अनुदान मिळणार आहे. अनुदान रुपये 200 प्रती टनप्रमाणे देण्याचा निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला.
याबाबतची माहिती सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी पत्रकार परिषद घेत दिली. सह्याद्री अतिथीगृह येथे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त ऊस गाळप अनुदान आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, सहकार मंत्री बाळासाहेब पाटील, कृषीमंत्री दादाजी भुसे.
याबरोबर सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे, वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते. या निर्णयामुळे सरकारी तिजोरीवर सुमारे १०० कोटी रुपयांचा वित्तीय भार पडणार आहे. राज्यात १ मे २०२२ नंतर हंगाम संपेपर्यंत अंदाजे ५२ लाख टन गाळप अपेक्षित आहे.