पाथर्डी- श्री कानिफनाथ महाराजांचा पालखी सोहळा उत्साहात
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील मढी येथे तिसऱया श्रावणी शुक्रवारी रात्री काढण्यात आलेल्या कानिफनाथांच्या पालखी सोहळ्यासाठी भाविकांची मोठी गर्दी जमा झाली होती. पालखी गडावरून ग्रामप्रदर्शनासाठी येत असताना पालखीमार्ग भाविकांच्या गर्दीने फुलून गेला होता.
प्रत्येक श्रावणी शुक्रवारी मढी गावातून नाथांची पालखी व पंचधातू घोडय़ाची वाजतगाजत मिरवणूक काढण्यात येत असते. तिसऱया शुक्रवारी मात्र पालखी सोहळ्याला यात्रेचे स्वरूप येते. भांगरवाडी, लोणावळा, आळंदी, जळगाव, पुणे, नाशिक, मावळ, ठाणे, मोशी यांसह विविध गावांतील पायी दिंडय़ा व पालख्या मढी येथे पालखी सोहळ्यासाठी उपस्थित होत्या. कानिफनाथ मंदिराचा गाभारा व मुख्य मंदिरात केलेल्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले, तर पालखीमार्गावर सुशोभीकरण व आकर्षक विद्युतरोषणाई करण्यात आली होती. चिंचेची बाग, यात्रा मैदान, गणेश चौक भक्तनिवास परिसर येथील वाहनतळ भाविकांच्या गर्दीने फुलून गेले होते.
शुक्रवारी रात्री देवस्थान समितीचे अध्यक्ष व विश्वस्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली. यावेळी मढी देवस्थानचे अध्यक्ष संजय मरकड, विमल मरकड, बबन मरकड, भाऊसाहेब मरकड, रवींद्र आरोळे, श्याम मरकड, देवीदास मरकड, बाबासाहेब मरकड, ह.भ.प. लक्ष्मण महाराज मरकड, भाग्येश मरकड, बबन ढवळे, अमोल मरकड, रवींद्र मरकड, बाळासाहेब मरकड आदी उपस्थित होते. महाआरती झाल्यानंतर पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. या सोहळ्यात मढी येथील युवकांनी लेझीमनृत्य सादर केले.