ग्रामपंचायतींचे फटाके 206 गावात राजकीय मोर्चेबांधणी सुरु
By Admin
ग्रामपंचायतींचे फटाके 206 गावात राजकीय मोर्चेबांधणी सुरु
नगर सिटीझन टिम प्रतिनिधी
जिल्ह्यातील 206 ग्रामपंचायतींच्या पदाधिकार्यांचा कालावधी नोव्हेंबर व डिसेंबर या महिन्यांत संपत आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभागरचना, सदस्य व सरपंच पदाची आरक्षण प्रक्रिया पूर्ण झालेली आहे.
त्यामुळे दिवाळीनंतरच या ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक होणार आहे. दरम्यान, या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे. त्यामुळे आतापासून या गावांत राजकीय मोर्चेबांधणी सुरु झाली आहे.
येत्या नोव्हेंबर व डिसेंबर या दोन महिन्यांत 205 ग्रामपंचायतींचा कालावधी संपणार आहे. याशिवाय संगमनेर तालुक्यातील ढोलेवाडी या नव्या ग्रामपंचायतीची निर्मिती झालेली आहे. त्यामुळे 206 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी आवश्यक असणारे वार्डरचना, सदस्यांचे आरक्षण आदी प्रक्रिया पूर्ण केली आहे. सरपंचपदासाठी यापूर्वी आरक्षण निश्चित झालेले आहे. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने नोव्हेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.
भाजप -शिवसेना या युती सरकारच्या काळात सरपंचपदाची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 2019 पर्यंत जिल्ह्यातील सरपंचपदाची निवड थेट जनतेतून झाली. मध्यंतरी राज्यात महाविकास आघाडी सरकारने सत्तेवर आले. या सरकारने थेट सरपंच निवडीचा निर्णय रदृ केला. भाजप-शिवसेना (शिंदे गट) सत्तेवर आले. त्यांनी पुन्हा सरपंच निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पहिल्यांदाच अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींसाठी थेट सरपंचपदाची निवडणूक झाली.
18 सप्टेंबर रोजी अकोले तालुक्यातील 45 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका घेण्यात आल्या. आता दिवाळीनंतर 206 ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. यामध्ये अकोले तालुक्यातील भंडारदरा, चास, नेवासा तालुक्यातील माका, खुपटी, भेंडा खुर्द, वडाळा बहिरोबा, कांगोणी, जामखेड तालुक्यातील राजुरी, रत्नपूर, नगर तालुक्यातील कापूरवाडी, नागरदेवळे, वाळकी, नेप्ती, नांदगाव, राहाता तालुक्यातील साकुरी, सावळीविहिर बुद्रूक, नांदुर्खी, पारनेर तालुक्यातील भाळवणी, ढवळपुरी, पळशी गोरेगाव, राहुरी तालुक्यातील सोनगाव, कोल्हार खुर्द, श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी, बनपिंप्री, बेलवंडी, श्रीरामपूर तालुक्यातील कमालपूर, खंडाळा, शेवगाव तालुक्यातील दहिगाव ने, अमरापूर, पाथर्डी तालुक्यातील तिसगाव, भालगाव, कोल्हार. संगमनेर तालुक्यातील जोर्वे, साकूर, तळेगाव दिघे, धांदरफळ खुर्द व बुद्रूक, कर्जत तालुक्यातील कोपर्डी, कोपरगाव तालुक्यातील माहेगाव देशमुख, राजणगाव देशमुख, चांदेकसारे, चासनळी आदी या राजकीयदृष्ट्या महत्त्वपूर्ण ग्रामपंचायतींचा समावेश आहे.
डिसेंबरअखेर मुदत संपणार्या ग्रामपंचायतीं
नेवासा 13, जामखेड 3, नगर 28, राहाता 12, पारनेर 16, राहुरी 11, श्रीगोंदा 10, श्रीरामपूर 6, शेवगाव 12, पाथर्डी 11, संगमनेर 38, कर्जत 8, कोपरगाव 26, अकोले 11.
ग्रामपंचायत सरपंच आरक्षण
जोर्वे : सर्वसाधारण महिला, काष्टी : ओबीसी, कमालपूर : ओबीसी महिला, साकूर : अनुसूचित जाती, घुलेवाडी : सर्वसाधारण महिला, माहेगाव देशमुख : अनुसुचित जाती महिला, चांदेकसारे :ओबीसी, कोळपेवाडी : ओबीसी महिला, नेप्ती : सर्वसाधारण महिला, नागरदेवळे : सर्वसाधारण, वाळकी : ओबीसी, भेंडा खुर्द : सर्वसाधारण महिला, साकुरी : ओबीसी महिला, बनपिंप्री : ओबीसी, दहिगाव ने : अनुसूचित जाती महिला, भाळवणी : सर्वसाधारण, ढवळपुरी : ओबीसी महिला, कोल्हार : अनुसूचित जाती, तिसगाव : सर्वसाधारण महिला