पाथर्डी तालुक्यातील 'या' गावात बिबट्याचे दर्शन
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील दुलेचांदगाव शिवारात सोमवारी सायंकाळी बिबट्याने दर्शन दिले.
दोन दिवसांपूर्वी सुनील शेळके यांचे दोन बोकड अज्ञात प्राण्याने मारले होते. तसेच, उसाच्या शेतात काळविटाचा अर्धवट खाल्लेला मृतदेह आढळला होता. या दोन्ही ठिकाणी बिबट्यानेच शिकार केली असावी, असा अंदाज व्यक्त होत आहे. या घटनेमुळे घबराट पसरली आहे. वन अधिकार्यांनी परिसरात फिरून पाहणी केली.
पाथर्डी शहरापासून दुलेचांदगाव चार किलोमीटर अंतरावर आहे. सोमवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिंदे यांच्या पडक नावाच्या शेतात सोमनाथ मैड, हनुमान मैड, गोविंद क्षीरसागर या शेतकर्यांना बिबट्या दिसला. शेतकर्यांनी आरडाओरड करून परिसरातील शेतकर्यांना माहिती दिली. बिबट्याच्या भीतीने शेतकर्यांनी रात्र जागून काढली. सुमारे दीड वर्षापूर्वी पाथर्डी तालुक्यात बिबट्याने धुमाकूळ घालून तीन बालकांना ठार केले होते.
त्यानंतर अनेक बिबटे जेरबंद करण्यात आले होते. नरभक्षक बिबट्याला बीड जिल्ह्याच्या हद्दीत ठार करण्यात आले होते. आता पुन्हा बिबट्याने दर्शन दिल्याने दीड वर्षांपूर्वीची दहशत नागरिकांच्या मनात निर्माण झाली आहे. घटनेची माहिती समजताच वनपाल राजेंद्र आल्हाट यांनी पथकासह दुलेचांदगाव परिसराला भेट देऊन ठशांची छायाचित्रे घेतली. ती ठसेतज्ज्ञांकडे पडताळणीसाठी पाठविण्यात आली आहेत. पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी दुलेचांदगावचे सरपंच रणजित बांगर यांनी केली आहे.