मुंबई शहराच्या पोलीस उपायुक्तपदी पाथर्डी सुपुत्र डॉ. शिवाजी राठोड
पाथर्डी प्रतिनिधी:
अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्याचे सुपुत्र आयपीएस डॉ. शिवाजी राठोड यांना मुंबई शहर येथे पोलिस उपायुक्त (विशेष शाखा-१) म्हणून नुकतीच पदोन्नती देण्यात आली आहे.
डॉ. शिवाजी राठोड हे मूळचे अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील पत्र्याचा तांडा गावचे आहेत. डॉ. शिवाजी राठोड यांचे ५ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण श्री तिलोक जैन विद्यालयात झाले. त्यानंतर त्यांनी मुंबई येथे पशुवैद्यकीय विज्ञान पदवीधर व पशुसंवर्धन (बी. व्ही. एससी. अँड ए. एच) या पदवीचे शिक्षण घेतले.
पाथर्डी सारख्या ग्रामीण भागातून पुढे येत परिस्थितीशी दोन हात करत राठोड यांनी आयपीएस बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून स्पर्धा परीक्षांची तयारी केली. आपल्या जिद्दीच्या आणि मेहनतीच्या जोरावर राठोड यांनी आयपीएस परीक्षा पास केली. डॉ. शिवाजी राठोड हे २००९ बॅचचे आयपीएस आहेत. त्यांना मुंबई शहर येथे पोलिस उपायुक्त म्हणून बढती मिळाली आहे.
त्यांनी मुर्तीजापुर, पैठण, नाशिक, नांदेड, ठाणे, उल्हासनगर, मुंबई येथे पोलिस उपअधीक्षक म्हणून उत्कृष्ठ कामगिरी केली. तसेच लातूर व ठाणे ग्रामीण येथे पोलिस अधिक्षक म्हणून कर्तव्यदक्ष व सक्षम पोलिस अधिकारी म्हणून नावलौकिक मिळवला.
डॉ. राठोड यांनी मनोमिलन, दारू मुक्ती, एक गाव एक गणपती, डीजे मुक्त सण- उत्सव असे अनेक प्रकारे सामाजिक कार्यक्रम राबविले.
पोलीस उपायुक्त बढती बद्दल डॉ. राठोड यांचे पाथर्डी व अहमदनगर जिल्ह्यासह सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.