पाथर्डी तालुक्यात भुरट्या चोरांचा धुमाकूळ
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यात भुरट्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, मंदिरातील मौल्यवान वस्तू व पाळीव प्राण्यांवर चोरट्यांचा डोळा आहे. दररोज तालुक्यात तीन-चार ठिकाणी चोरीच्या छोट्या मोठ्या घटना घडत आहेत.
तालुक्यातील जिरेवाडी येथील गहिनाथ सखाराम आंधळे शनिवारी रात्री जेवण करून घरात झोपले असताना त्यांच्या घराला बाहेरून कडी लावून दारातील पत्र्याच्या शेडमध्ये बांधलेल्या सहा शेळ्या ज्यांची 31 हजार रुपये किमतीच्या चोरट्याने चोरून नेल्या आहेत. आंधळे यांनी पाथर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. पाथर्डी शहरात चिंचपूर रस्त्याच्या कडेला राहणार्या अण्णा हरेर यांची 20 हजार रुपये किमतीची गाय चोरीला गेली. ही घटना शनिवारी रात्री घडली. दरम्यान, कौडगाव आठरे येथील किशोर धोंडिबा पवार या शेतकर्याच्या शेतातील डाळिंबाच्या झाडाची सुमारे 70 कॅरेट डाळिंब चोरट्यांनी तोडून नेले. बाजारभावाप्रमाणे या डाळिंबाची किंमत 70 हजार रुपये होती.
पवार यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहेत. त्याचबरोबर आडगाव येथील पीरबाबा मंदिराची दानपेटी फोडून चोरट्यांनी सुमारे 15 ते 20 हजारांचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली. चोरीच्या घटनांत वाढ होऊनही पोलिस गांभीर्याने दखल घेत नाहीत. गेल्या 15 दिवसांत तालुक्यात सुमारे 15 ते 20 चोरीच्या घटना घडल्या; मात्र गुन्ह्याचा तपास पोलिसांकडून लागत नसल्याने चोरट्यांचे मनोधैर्य वाढले आहे. एका दिवसात चार ते पाच चोरीच्या घटना घडू लागल्या आहेत. पोलिसांकडून चोरीचा शोध लागत नसल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे.