महिलेचा खून; पतीसह तिघांना अटक ; २ फरार; संशयातून खून झाल्याचा प्रकार
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
महिलेचा खून करून मृतदेह निर्जनस्थळी पुरल्याचा प्रकार गुरुवारी (दि.६ ऑक्टोबर रोजी ) सायंकाळी उघडकीस आला होता. धक्कादायक म्हणजे संबंधित महिलेचा खून पतीने व महिलेच्या सासऱ्याने केल्याची बाब उघडकीस आली आहे. चाकण पोलिसांनी पतीसह तिघांना अटक केली असून दोन जण अद्याप फरार आहेत.
आशा गोरक्ष देशमुख ( सध्या रा. मेदनकरवाडी , ता. खेड, मूळ रा. श्रीगोंदा ) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती गोरक्ष बबन देशमुख (वय 35, रा.मेदनकरवाडी ) सासरा बबन शिंवलींग देशमुख (वय 62 रा. अहमदनगर) व रोशन गजानन भगत (वय 22, रा. मेदनकरवाडी) अशी अटक आरोपींची नावे आहेत. रोशन याचा मित्र रेवा आणि मुंडे असे दोघेजण अद्याप फरार आहेत. .
आरोपी गोरक्ष याने २९ ऑगस्ट २०२२ रोजी इतर आरोपींच्या सहाय्याने पत्नीचा गळा आवळून खून केला.
त्यानंतर चाकण आळंदी रस्त्यावरील वन विभागाच्या जंगलात तो नेऊन पुरला. पुढे त्याने स्वतः वर संशय येवू नये यासाठी चाकण पोलीस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दिली. त्यानंतर गोरक्षनेच शनिवारी दि. 1 ऑक्टोबर २०२२ रोजी प्रेत खड्ड्यातून बाहेर काढले व जाळले. मात्र, पाऊस पडत असल्याने प्रेत अर्धवट जळाले. त्यानंतर त्यांनी ते प्रेत चाकण आळंदी रस्त्यावरील वनविभागाच्या तळ्यात फेकून दिले. परिसरात दुर्गंधी पसरताच पोलिसांना याची खबर मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला व प्रेत उत्तरीय तपासणीसाठी पाठवले. यावेळी गळा आवळून खून झाल्याचे उत्तरीय तपासणी मध्ये स्पष्ट होताच पोलिसांनी पतीला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. पत्नीवरील अनैतिक संबंधाच्या संशयातून हा खून केल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तीघांना अटक केली असून चाकण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वैभव शिंगारे यांच्या मार्गदर्शनाखाली चाकण पोलीस पुढिल तपास करत आहेत.