महाराष्ट्र
प्रगल्भ युवापिढी घडविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची – अभय आव्हाड
By Admin
प्रगल्भ युवापिढी घडविण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्वाची – अभय आव्हाड
पाथर्डी- प्रतिनिधी
आजच्या प्रगत विज्ञान युगामध्ये संपूर्ण जग एकमेकांच्या खूप जवळ आले आहे. जगाच्या कोणत्याही कानाकोपऱ्यात काहीही झाले तरी त्याची ब्रेकिंग न्यूज लगेच होते.प्रसारमाध्यमांवर योग्य आणि अयोग्य दोन्हीही गोष्टी मोठ्या प्रमाणावर प्रसारित केल्या जातात. परंतु प्रगल्भ युवापिढी घडविण्यासाठी चांगल्या व समाजोपयोगी घटना प्रसारमाध्यमांनी प्रसारित केल्यास ही माध्यमे ज्ञानाची कोठारे होतील. त्यासाठी प्रसारमाध्यमांनी आपली विश्वासार्हता जपणे अतिशय महत्वाचे आहे, असे प्रतिपादन पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अभय आव्हाड यांनी केले.
ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात आयोजित युवा संवाद २०२२ या कार्यक्रमात सशक्त समाजनिर्मितीत प्रसारमाध्यमांची भूमिका या विषयावर बोलत होते. यावेळी व्यासपीठावर जेष्ठ पत्रकार अविनाश मंत्री, डॉ. बबन चौरे, पर्यवेक्षक प्रा. शेखर ससाणे, प्रा. विजय देशमुख, ग्रंथपाल प्रा. किरण गुलदगड, प्रा मन्सूर शेख, प्रा. आशा पालवे, प्रा. सुरेखा चेमटे आदी उपस्थित होते.
अभय आव्हाड पुढे म्हणाले, प्रसारमाध्यम हा लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखला जातो. समाजाच्या या माध्यमांकडून असलेल्या अपेक्षा आजही जिवंत असून प्रसारमाध्यमांनी समाजभान राखले तर माध्यमांचे समाजातील स्थान अजून बळकट होईल. सध्या बातम्यांचे सनसनाटीकरण करण्याचा कल वाढू लागला असून या माध्यमांत टीआरपी हाच एकमेव मापदंड ठरू लागल्याने ब्रेकिंग न्यूज करून माहिती माथी मारण्याची अघोषित स्पर्धा सुरु झाली आहे.समाजमाध्यमे ही संघर्षाची साधने न होता संवादाची, सौहार्दाची साधने म्हणून वापरली गेली तर माध्यमांविषयी समाजाकडून असलेल्या अपेक्षांना बळकटी येईल व लोकशाही व्यवस्थेचा चौथा स्तंभ म्हणून ज्या जबाबदाऱ्या माध्यमांवर असतात त्यांचे पालन केल्याचे पुण्य माध्यमांना प्राप्त होईल कारण त्याच अपेक्षेने समाज माध्यमांकडे आजही पाहत आहे, असे ते शेवटी म्हणाले.
यावेळी कनिष्ठ महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी या युवा संवादात प्रसारमाध्यमांविषयी आपली मते परखडपणे मांडली. अभय आव्हाड सामाजिक प्रतिष्ठानमार्फत महाविद्यालयाची राष्ट्रीय खेळाडू योगिता खेडकर हिला पुढील स्पर्धेच्या तयारीसाठी आर्थिक मदत मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. शेखर ससाणे, सुत्रसंचालन प्रा. मन्सूर शेख व प्रा देवेंद्र कराड तर आभार प्रा. मोहम्मदसलीम शेख यांनी मानले.
Tags :
445
10