पाथर्डी- तिसगाव येथे दवाखान्यात घुसून डॉक्टरला बेदम मारहाण
नगर सिटीझन live टिम प्रतिनिधी
पाथर्डी तालुक्यातील व्यापारी बाजारपेठेचे गाव म्हणून ओळख असलेल्या तिसगाव येथील एका डॉक्टरला गुरुवारी त्यांच्या दवाखान्यात घुसून मारहाण झाल्याची घटना घडली आहे.
मात्र, या मारहाणीचे कारण गुलदस्त्यातच आहे.
तिसगाव येथील डॉक्टरला एका पेशंटने उपचारासाठी फोन केला. त्यानंतर संबंधित डॉक्टरने या पेशंटला व्हिडिओ कॉल करण्याचे सांगितले. याच व्हिडिओ कॉलमुळे संभ्रम निर्माण झाला आणि काही वेळातच डॉक्टरला दवाखान्यात येऊन काही तरुणांनी मारहाण केली.
या मारहाणीचे कारण जरी गुलदस्त्यात असले तरी, आठवडे बाजारच्या दिवशी डॉक्टरला झालेली मारहाण मात्र लपून राहिली नाही. त्याची तिसगाव परिसरात चर्चा सुरू झाली. तिसगावमध्ये डॉक्टरला मारहाण अशा घटना यापूर्वी देखील घडल्या आहेत. त्यावेळी संबंधित डॉक्टरने लगेच पोलिस ठाण्यात जाऊन मारहाण करणार्यांविरोधात गुन्हा दाखल केला. मात्र, गुरूवारी मारहाण झालेल्या डॉक्टरने या घडलेल्या प्रकाराबाबत तोंडावर बोट ठेवणे पसंत केल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.