शिक्षकांच्या अनुदानासाठी ४२१ कोटींच्या निधीची तरतूद; अधिवेशनात पुरवणी मागणी सादर
By Admin
शिक्षकांच्या अनुदानासाठी ४२१ कोटींच्या निधीची तरतूद; अधिवेशनात पुरवणी मागणी सादर
प्रतिनिधी - नगर citizen
आजपासून सुरू झालेल्या अधिवेशनात पहिल्याच दिवशी शिक्षकांना गोड बातमी मिळाली आहे. प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांच्या शिक्षकांच्या अनुदानासाठी सुमारे ४२१ कोटींच्या अनुदानाची पूरक (पुरवणी) मागणी सादर झाली आहे. यासंदर्भात लवकरच शासन निर्णय निर्गमित होईल, अशी माहिती शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी दिली.
१५ ते २० वर्षांपासून राज्यातील शिक्षक अनुदानाच्या प्रतीक्षेत विनावेतन ज्ञानार्जन करत आहे. यासंदर्भात शेकडो आंदोलने झाली असून, दोन ते तीन वर्षांत आंदोलनांचे रेकॉर्ड झाले आहे. स्वतः शिक्षक आमदारांनीही उपोषण केले. शिवाय अधिवेशनातही शिक्षकांच्या अनुदानासाठी सातत्याने आवाज उठविला आहे.
याशिवाय गेल्या ३० दिवसांपासून शिक्षक समन्वय समितीच्या माध्यमातून राज्यातील हजारो शिक्षक आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत. या सर्वांचा परिपाक म्हणजे शासनाने अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी निधीची तरतूद करण्याचा निर्णय घेत पुरवणी मागणी सादर केली असून, यावर लवकरच निर्णय होऊन शासन निर्णय निर्गमित होईल, असे आमदार दराडे यांनी सांगितले.
शासनाने यापूर्वी निर्णय घेऊन १ नोव्हेंबर २०२० पासून २० टक्के व पूर्वीच्यांना ४० टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी पात्र असलेल्या शाळांची यादी मागील महिन्यात जाहीर केली असून, त्यानंतर आता निधीची तरतूद झाली आहे. यापूर्वी २० टक्के अनुदान जाहीर झालेल्या राज्यातील १७ हजार २९९ शिक्षकांच्या पदांसाठी वाढीव २० टक्केसाठी २६३ कोटींची पूरक मागणी सादर झाली आहे. याशिवाय कनिष्ठ महाविद्यालये व ज्यादा तुकड्यांवरील आठ हजार ८२० पदांना २० टक्के अनुदानासाठी १२० कोटी ५६ लाख रुपये, तर प्राथमिक शाळांतील एक हजार ६८८ शिक्षकांना २० टक्क्यांसाठी २० लाख व माध्यमिक शाळांतील एक हजार २७६ शिक्षक पदांना २० टक्के अनुदानासाठी १७ कोटींची लाक्षणिक पुरवणी मागणीदेखील सादर केली आहे.
आवश्यक असलेला सदरचा निधी चालू आर्थिक वर्षाच्या अनुदानातून शक्य असल्याने त्यासाठी ही मागणी सादर करण्यात आली. पुरवणी मागणी मंजुरीनंतर लवकरच अनुदान वितरणाचा शासन निर्णय काढून शिक्षकांना दिलासा द्यावा, या मागणीसाठी आम्ही सर्व शिक्षक आमदार अधिवेशनात वित्तमंत्री, शिक्षणमंत्र्यांकडे आग्रह धरणार असून, आवाज उठवणार आहे.
-किशोर दराडे, शिक्षक आमदार