सीएनजी ट्रॅक्टरमुळे वाढणार शेतकऱ्याचे उत्पन्न, जाणून घ्या शेतकऱ्याला होणारे फायदे
By Admin
सीएनजी ट्रॅक्टरमुळे वाढणार शेतकऱ्याचे उत्पन्न, जाणून घ्या शेतकऱ्याला होणारे फायदे
प्रतिनिधी - नगर सिटीझन
शेतकऱ्यांचे उत्पन्न 2022 पर्यंत दुप्पट करण्याचे लक्ष्य केंद्र सरकारचे आहे. यासाठी शेतीची पद्धत सोपी व्हावी, कमी उत्पन्न खर्चात अधिकाधिक उत्पन्न घेता यावे यासाठी अनेक उपाययोजना सरकारकडून राबवण्यात येत आहेत. यात नांगरणीपासून ते शेतमाल वाहतूक अशा अनेक कामांसाठी शेतकऱ्यांसाठी सर्वात उपयुक्त साधन म्हणजे ट्र्रॅक्टर. याच ट्रॅक्टरच्या डिझेलसाठी शेतकऱ्यांचे दरवर्षी लाखो रुपये खर्च होतात. शेतकऱ्यांचे उत्पन्न अधिक आणि खर्च कमी व्हावे उद्देश साध्य करताना सरकारने आता डिझेल ट्रॅक्टरला सीएनजी ट्रॅक्टरचा पर्याय उपलब्ध केला आहे. सरकारचे दावा आहे की, सीएनजी ट्रॅक्टरच्या वापरामुळे शेतकऱ्यांची वार्षिक 1.5 लाख रुपयांची बचत होईल. (CNG tractors will increase farmers' income)
केंद्रीय परिवहन मंत्री नितिन गडकरी यांनी 12 फेब्रुवारी रोजी सीएनजी ट्रॅक्टरची घोषणा केली.
यावेळी त्यांनी सीएनजी ट्रॅक्टरचे अनेक फायदे सांगितले. सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना आपले जीवनमान सुधारण्यास मदत होईल. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत रेट्रेफिटेड सीएनजी टॅक्टरचा देखभालीचा खर्च कमी असेल आणि यामुळे इंधन बचतही होईल.
सीएनजी ट्रॅक्टरमुळे शेतकऱ्यांना होणारे फायदे
1. शेतकरी प्रतिवर्षी डिझेलवर 3 ते 3.5 लाख रुपये खर्च करतो. सीएनजी ट्रॅक्टरमुळे यात प्रतिवर्षी 1.5 लाख रुपये बचत होऊ शकते, असा दावा नितिन गडकरी यांनी केला आहे. तसेत सीएनजी किट मेक इन इंडियामार्फत बनविण्यात आल्याचेही गडकरी म्हणाले.
2. पेंढा ही देशातील एक मोठी समस्या आहे. पण यामध्ये शेतकर्यांचे उत्पन्नदेखील लपलेले असल्याचे सरकारचे म्हणणे आहे. पेंढ्यामुळे बायो-सीएनजीचे उत्पादनही शक्य आहे. बायो सीएनजी उत्पादनांची युनिट विक्री करुन शेतकरी पैसे कमवू शकतात. या ट्रॅक्टरची निर्मिती रावमॅट सॉल्युशन्स आणि टॉमासेटो एशिल इंडिया यांनी संयुक्तपणे केली आहे.
3. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत सीएनजी ट्रॅक्टरचा देखभाल खर्च कमी येईल. डिझेल ट्रॅक्टरमध्ये कार्बन डायऑक्साईडमुळे अनेक तांत्रिक बिघाड निर्माण होतात. हे बिघाड दुरुस्त करण्यासाठी वारंवार खर्चाचा भुर्दंड सहन करावा लागतो. मात्र सीएनजी ट्रॅक्टरमध्ये ही समस्या येणार नाही.
4. सीएनजी ट्रॅक्टरमुळे वाढत्या प्रदूषणाला आळा घालण्यास मदत होईल. काही राज्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर शेती केली जाते. त्यामुळे दिवसरात्र ट्रॅक्टर चालू असतो. डिझेल इंजिन असल्यामुळे तेथे प्रदूषणही मोठ्या प्रमाणात होते. सीएनजी ट्रॅक्टरमुळे प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊ शकते. डिझेलच्या तुलनेत सीएनजीमध्ये 70 टक्के कमी कार्बन उत्सर्जन होते.
5. डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेत रेट्रोफिटेड सीएनजी ट्रॅक्टर दीर्घकाळ चालते. त्यामुळे शेतकऱ्यांची मोठी बचत होईल. सीएनजी ट्रॅक्टरला सुरु करण्यासाठी डिझेलची आवश्यकता असल्याने ट्रॅक्टरमध्ये डिझेल इंजिन असेल. मात्र सुरु झाल्यानंतर ट्रॅक्टरचे फ्युअल सोर्स बदलून सीएनजीवर शिफ्ट होईल. (CNG tractors will increase farmers' income)