महाराष्ट्र
मतदानकार्ड आधार कार्डशी लिंक होणार असल्याने दुबार मतदारांना आळा बसणार- संजय माळी
By Admin
मतदानकार्ड आधार कार्डशी लिंक होणार असल्याने दुबार मतदारांना आळा बसणार- संजय माळी
पाथर्डी - प्रतिनिधी
मतदारांचा आधार क्रमांक त्यांच्या मतदार यादीतील नोंदीशी जोडला जाणार आहे. यासाठी नमुना फॉर्म ६ ब तयार करण्यात आला आहे. मतदाराचे नाव मतदार यादीतील नोंदीशी आधार क्रमांक जोडल्यामुळे मतदार यादीतील दुबार नोंदणी कमी होणार आहेत व मतदार यादी शुद्धीकरण कामाला यामुळे मदत होणार आहे. या अनुषंगाने १ ऑगस्टपासून संपूर्ण पाथर्डी तालुक्यात व २२२ विधानसभा मतदारसंघात विशेष मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती निवडणूक शाखेचे नायब तहसीलदार संजय माळी यांनी दिली.
याबाबतचे सर्व बी एल ओ यांचे विशेष प्रशिक्षण ५ ऑगस्ट रोजी नायब तहसीलदार संजय माळी यांचे मार्गदर्शनाखाली तहसील कार्यालयात झाले. यासाठी बी एल ओ यांच्यामार्फत घरोघरी भेट देऊन मतदाराचा आधार क्रमांक फॉर्म ६ ब द्वारे जमा करण्यात येणार आहे. मतदारांना फॉर्म ६ ब प्रती उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
लोकप्रतिनिधित्व अधिनियम, १९५० मधील कलम मधील दुरुस्तीन्वये सर्व मतदाराकडून आधार संकलनाचा उद्देश, मतदारांची ओळख प्रस्थापित करणे व मतदार यादीतील प्रमाणीकरण करणे हा आहे. तरी सर्व मतदारांनी आपल्या गावातील/ भागातील मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बी एल ओ) यांचे द्वारे गरुडा ॲपद्वारे जोडणी करून घ्यावी. त्याकरिता आपले व आपल्या कुटुंबातील व्यक्तींची आधारकार्ड व मतदान कार्ड सोबत घ्यावे. मतदारांना ऑनलाईन पद्धतीने आधार क्रमांक भरण्यासाठी फार्म ६ ब एरोनेट, गरूडा ॲप, एन व्ही एस पी,व्हि एच ए या माध्यमावर देखील उपलब्ध आहेत. आधार क्रमांक देणे पूर्णपणे ऐच्छिक आहे. तरी मतदान नोंदणी अधिकारी यांच्या मार्फत सर्व मतदारांना आधार नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन प्रांताधिकारी देवदत्त केकाण, तहसीलदार श्याम वाडकर व नायब तहसीलदार संजय माळी यांचेकडून करण्यात येत आहे.
मतदार ओळखपत्राला आता आधार क्रमांक लिंक होणार असल्याने दुबार मतदाराला आळा बसणार आहे. प्रशासनावरील दुबार नोंदीमुळे येणारा ताण कमी होईल. मतदार यादी शुद्ध होऊन मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांचे काम हलके होईल, असे नायब तहसीलदार संजय माळी यांनी सांगितले.
Tags :
8726
10