26-Mar-2025
कळसुबाई शिखर व हरिश्चंद्रगडासाठी 'रोपवे'चा प्रस्ताव, पर्वतमाला योजनेत राज्यातील ४५ रोपवे प्रस्तावांना राज्यशासनाची तत्त्वतः मान्यता
नगर सिटीझन live टिम नेटवर्क
अकोले तालुक्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्रगड येथे रोपवे प्रस्तावित आहेत. ‘पर्वतमाला ‘ योजनेत राज्यातील ज्या ४५ रोपवे प्रकल्पांना राज्य शासनाने तत्वतः मान्यता दिली आहे त्यात या दोन रोपवे योजनांचा समावेश आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यात हेच दोन रोपवे प्रकल्प प्रस्तावित आहेत.
शिखरस्वामीनी कळसुबाई आणि दुर्गराज हरिश्चंद्रगड ही दोन्ही ठिकाणे दुर्ग प्रेमींची, पर्यटकांची आवडती ठिकाणे असून या प्रस्तावित रोपवेमुळे त्या परिसरातील पर्यटनाला चालना मिळणार आहे. ही दोन्ही शिखरे अकोले तालुक्यात असली तरी अकोल्या लगतच्या इगतपुरी तालुक्यातून कळसुबाई शिखरावर तर जुन्नर तालुक्यातून हरिश्चंद्रगडावर जाण्याचे मार्ग आहेत. त्यामुळे रोपवेची सुरवात अकोले तालुक्यातुन होते की शेजारच्या जिल्ह्यातील तालुक्यांमधून होते या वर कोणत्या भागातील पर्यटन व्यवसायाला याचा अधिक फायदा होणार हे अवलंबुन आहे.
केंद्र शासनाच्या रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडून २०२२-२३ या वर्षाच्या अर्थसंकल्पात ‘राष्ट्रीय रोप वे कार्यक्रम -पर्वतमाला ची घोषणा करण्यात आली. या योजनेअंतर्गत डोंगराळ प्रदेश, शहरातील अतिगर्दीची ठिकाणे, दुर्गम भागांना रोप वे द्वारे जोडण्यात येणार आहे. यामुळे पर्यटन व धार्मिक स्थळांचे महत्व वाढून पर्यटनास चालना मिळणार आहे.
पर्वतमाला’ योजने अंतर्गत राज्यातील हवाई रज्जूमार्ग प्रकल्प (रोपवे)च्या कामाच्या अनुषंगाने केंद्र शासनाच्या ‘राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि (एनएच एलएमएल NHLML)व राज्य शासन यांच्या मध्ये सामंजस्य करार करण्यात आला आहे. राज्यात रोप वे ची ४५ कामे प्रस्तावित असून त्यातील १६ कामे राज्य सरकार करणार आहे तर २९ कामे राष्ट्रीय राजमार्ग लॉजिस्टिक व्यवस्थापन लि मार्फत करण्यात येणार असून त्यास राज्यशासनाने तत्वतः मान्यता दिली आहे.
रोपवे ची जी कामे एनएचएलएमएल मार्फत केली जाणार आहेत त्यासाठी राज्याचा सार्वजनिक बांधकाम विभाग ३० वर्षाच्या भाडेपट्टीवर जागा उपलब्ध करून देणार आहे. सा.बां.विभागाकडे स्वतःची जागा उपलब्ध नसल्यास इतर विभागांकडून जागा हस्तांतरित करून घेऊन अथवा खाजगी मालकीची जागा असेल तर विहित मार्गाने संपादित करून ३० वर्षाच्या भाडेपट्टीवर उपलब्ध करून दिली जाणार आहे.
प्रत्येक प्रकल्पाचा सविस्तर प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या पायाभूत सुविधा समितीपुढे सादर करावयाचा आहे. १९ मार्च २०२५ रोजी राज्याच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत या बाबतचा शासन आदेश काढण्यात आला आहे. एनएचएलएमएल मार्फत जी २९ कामे प्रस्तावित आहेत त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील कळसुबाई शिखर आणि हरिश्चंद्र किल्ला अशा दोन कामांचा समावेश आहे. अहिल्यानगर आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवर असणारे १ हजार ६४६ मीटर उंचीचे कळसुबाई चे शिखर हे राज्यातील सर्वात उंच शिखर होय.
सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर असल्यामुळे वर्षभर दुर्ग प्रेमींचा, ट्रेकर्सचा येथे राबता असतो. शिखरावर कळसुबाई देवीचे मंदिर असून अनेक भाविकांची ही देवी कुलदैवत आहे. नवरात्रात नऊ दिवस भाविकांची मोठी गर्दी शिखरावर होत असते. कळसुबाई शिखरानजीकच प्रसिद्ध भंडारदरा धरण, रतनगड ,पर्यटकांचे आकर्षण असणारी साम्रद येथील प्रसिद्ध सांदण दरी,घाटघरचा कोकण कडा अशी अनेक पर्यटन स्थळे आहेत,अभिजात निसर्ग सौदर्याचे कोंदण लाभलेला भंडारदरा जलाशय, तेथे पडणारा धुवाधार पाऊस आणि कोसळणारे धबधबे हेही निसर्गप्रेमींचे खास आकर्षण.या सर्व बाबींमुळे हजारो पर्यटक दर वर्षी या परिसराला भेट देत असतात. पर्यटकांसाठी आकर्षण म्हणून कळसुबाई शिखरावर जाण्यासाठी रोप वे असावा ही या परिसरातील जनतेची,निसर्गप्रेमींची अनेक वर्षांची मागणी आहे .